भारत आणि चीनमधील तणावाचा मुद्दा बुधवारी लोकसभेतही गाजला. भारतावर हल्ला करण्यासाठी चीनची तयारी असून भारताने त्यांच्यापासून सतर्क राहायला हवे असे माजी संरक्षण मंत्री मुलायमसिंह यादव यांनी म्हटले आहे.
लोकसभेत चीनसोबतच्या तणावावरुन समाजवादी पक्षाचे खासदार आणि माजी संरक्षण मंत्री मुलायमसिंह यादव यांनी संसदेत भाष्य केले. सिक्कीम आणि भूतानवर कब्जा करण्याचा चीनचा डाव आहे. भारतावर हल्ला करण्याची त्यांची तयारी झाली आहे. भारताला पाकिस्तानपेक्षा जास्त धोका चीनपासून असून भारताविरोधात ते पाकिस्तानची मदत घेत आहेत असे मुलायमसिंह यांनी सांगितले. पाकिस्तानमध्ये चीनने अण्वस्त्र पाठवली आहेत असा दावा त्यांनी केला. चीनसंदर्भात वारंवार मुद्दा उपस्थित करुनही केंद्र सरकार ठोस भूमिका मांडत नाही. चीनविरोधात सरकारने काय पावले उचलली हे सरकार का जाहीर करत नाही असा सवाल त्यांनी विचारला. लोकसभेत मुलायमसिंह मुद्दा मांडत असताना लोकसभाअध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी त्यांना संक्षिप्त स्वरुपात तुमचे म्हणणे मांडा अशा सुचना वारंवार केल्या. पण मुलायमसिंह यांनी त्यांचे बोलणे सुरुच ठेवले.
चीनप्रश्नावर या पूर्वीच्या सरकारने केलेल्या चुकांवरही त्यांनी टीका केली. भारताने तिबेटला चीनच्या ताब्यात द्यायला नको हवे होते. ही भारताची सर्वात मोठी चुक होती. आता सरकारने तिबेटच्या स्वातंत्र्याचे समर्थन केले पाहिजे आणि धर्मगुरु दलाई लामांची सर्वतोपरी मदत केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. चीन काश्मीरमध्ये पाकची मदत करत असून तिबेटच्या सीमेवर युद्धाभ्यास सुरु आहे असे सांगत त्यांनी चीनच्या वाढत्या हस्तक्षेपाकडे लक्ष वेधले. भूतान आणि सिक्कीमच्या सुरक्षेची जबाबदारी भारताकडे आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले. भारतात येणाऱ्या स्वस्तातल्या चिनी मालावरही त्यांनी कडाडून टीका केली.